नाशिकरोड : परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांचे काम पूर्ण झाले असून, देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागल्याने सायंकाळनंतर रस्ते गर्दीने फुलण्यास सुरुवात झाली आहे.नाशिकरोड येथे जवळपास १२५ लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणरायाची स्थापना केली आहे. गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवशी जवळपास बहुतांश गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यांचे काम पूर्ण झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने देखावे पाहण्यासाठी भाविकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने सायंकाळनंतर रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मंडळांनी आपापल्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने परिसर विद्युत प्रकाशाने उजाळून जात आहे, तर गणरायाची व देखाव्यानुसार विविध धार्मिक देवदेवतांची व सामाजिक प्रबोधनात्मक गाण्यांमुळे सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी व विशेषत: मंडळाचे देखावे असलेल्या भागातील मनपाचे विद्युत पथदीप बंद असल्यामुळे रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, अनुराधा फ्रेंड सर्कल, अथर्व फ्रेंड सर्कल, माहेश्वरी मित्रमंडळ, स्वराज्य सांस्कृतिक मित्रमंडळ, ओमकार मित्रमंडळ, बालाजी सोशल फाउंडेशन, मनपा कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, ईगल स्पोर्ट्स क्लब, मातोश्री मित्रमंडळ, वर्धमान मित्रमंडळ, आयएसपी वेल्फेअर कमिटी, संभाजीरोड मित्रमंडळ, बिटको पॉइंट मित्रमंडळ, हुतात्मा अरविंद गायकवाड मित्रमंडळ, मांग-गारुडी बहुद्देशीय संस्था, सप्तशृंगी मित्रमंडळ, राम-रहीम मित्रमंडळ, सुभाषरोड व्यापारी मित्रमंडळ, जी फाउंडेशन आदि विविध मंडळांचे धार्मिक, पौराणिक, सामाजिक, भव्य गणेशमूर्ती आदि प्रकारचे चलत देखावे आकर्षण ठरले आहे. (प्रतिनिधी)
नाशिकरोडला मंडळांचे देखावे खुले
By admin | Updated: September 3, 2014 00:18 IST