पंचवटी : पंधरवड्यापूर्वी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या कोथिंबीरला सोमवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ रुपये प्रतिजुडी असा बाजारभाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च तर सोडाच गाडीचे भाडेही निघाले नसल्याने कोसळलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक बाजार समितीत सोमवारी केवळ ३० टक्के कोथिंबीर मालाची आवक झाली. त्यातच मुंबईच्या वाशी बाजार समितीत लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोथिंबीरची आवक होत असल्याने नाशिक बाजार समितीत कोथिंबीरचे बाजारभाव घसरले आहे. पंधरवड्यापूर्वी कोथिंबीर १९० रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी झाली होती. लातूर जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून ४० ते ५० चारचाकी भरून कोथिंबीर आवक होत आहे. मुंबईच्या बाजार समितीत अल्प दराने कोथिंबीर मिळत असल्याने मुंबईच्या ९० टक्के व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्याचे टाळले आहे. नाशिक बाजार समितीतून सध्या गुजरात राज्यात कोथिंबीर निर्यात केली जात आहे. (वार्ताहर)
कोथिंबीर पाच रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:46 IST