लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पाणी वाढत असल्याने चणकापूर व अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे. कळवण शहरासह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, ओव्हरफ्लो झालेल्या चणकापूरमधून ३००० क्यूसेसने गिरणा नदीपात्रात, तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून २००० क्यूसेसने नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे, तर चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्यात ५० क्यूसेसने पूरपाणी सोडण्यात आले आहे. गेल्या गुरु वारी १२५.७९ मिमी, शुक्र वारी १५८.७० मिमी, तर शनिवारी गेल्या २४ तासांत तालुक्यात सरासरी १७६.६ मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले . चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात २९७ मिमी पाऊस पडला असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात ४०० मिमी पाऊस पडला. चणकापूरमध्ये ११४० दशलक्ष घनफूट (४३ टक्के), तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पात ६५० दशलक्ष घनफूट (४९ टक्के) जलसाठा झाला आहे. चणकापूर व अर्जुनसागर प्रकल्पाचे गेट उघडे असल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात हजारो क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा, पुनंद तसेच बेहडी नदी खळखळून वाहू लागली आहे.चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पुन्हा पावसाचे संकेत दिले आहेत. कळवण शहर व तालुक्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे चांगला पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असून, कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले असून, बांध फुटले आहे, तर रस्ते उखडून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. १५ आॅगस्टपर्यंत चणकापूरसह अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाचे गेट उघडे राहणार असल्याने पावसाचे पूरपाणी शेकडो क्यूसेसने नदीपात्रातून वाहत असल्याने पूरपाण्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, महसूल प्रशासनाने नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने यंदा वरुणराजाची मेहेरबानी चांगली राहील अशी आशा सर्वांना होती. त्यावेळी तालुक्यात ५५ ते ६० टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र पावसाने त्यानंतर दडी मारल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतातुर झाला होता. मात्र तीन-चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या पावसामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसेच तालुक्यातील नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत.
चणकापूर, अर्जुनसागरमधून नदीपात्रात विसर्ग
By admin | Updated: July 17, 2017 00:43 IST