नाशिक : कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा कोणा व्यक्ती वा विचारांवर नसून, तो व्यवस्थेवरचा हल्ला व आव्हान आहे. हे आव्हान मोडीत काढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आले असता, प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. कॉ. पानसरे यांचा मृत्यू ही दुखद घटना असून, गेली पाच दिवस त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे सरकारने त्यांना अधिक उपचारार्थ मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला होता. तेथे त्यांच्यावर उपचारही करण्यात आले, पण त्यात यश आले नाही. काल रात्री आपल्याला निरोप मिळताच हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पानसरे यांच्यावर हा हल्ला झालेला नसून तो व्यवस्थेवर झालेला आहे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या हादेखील व्यवस्थेवरीलच हल्ला होता. त्यामुळे खुनी पकडण्यासाठी राज्य सरकारला जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे ते करेल व पोलिसांनी ताकद दाखविली, तर ते सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात विचाराचे स्वातंत्र प्रत्येकाला आहे व ते अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शेवटी फडणवीस यांनी सांगितले.
व्यवस्थेवरचा हल्ला मोडीत काढू मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा
By admin | Updated: February 22, 2015 00:25 IST