नाशिक : शिवजयंती म्हटली की, ढोल-ताशा, डीजेचा दणदणाट, चौका-चौकात मिरवणुका असे वातावरण असते; मात्र येथील उधाण युवा ग्रुपच्या वतीने यंदा आगळ्या प्रकारे शिवजयंती साजरी केली जाणार आहे. ग्रुपच्या वतीने ‘छत्रपतींच्या व्यवस्थापनाची तत्त्वे’ या विषयावरील माहितीपत्रकांचे प्रकाशन करून शिवजयंतीला त्यांचे वाटप केले जाणार आहे. उधाण युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील एकमेव असलेल्या नाशिक शहरातील म्हसरूळ येथील छत्रपती शिवमंदिरामध्ये छत्रपती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून ‘छत्रपतींची व्यवस्थापन तत्त्वे’ या विषयावरील माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. नंतर या पत्रकांचे सर्व महाविद्यालयांमध्ये वाटप केले जाणार असून, सोशल मीडियातूनही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यासाठी युवकांना मार्गदर्शन मिळावे, असा या उपक्रमामागचा उद्देश आहे. (प्रतिनिधी)
छत्रपतींच्या तत्त्वांचा होणार जागर
By admin | Updated: March 25, 2016 23:39 IST