चांदवड : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांचे खोटे आदेश दाखवून शेतजमिनीची खरेदी करून शासनाचा कर बुडविल्याप्रकरणी ४२ जणांविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.येथील दुय्यम निबंधक सौ. सी. बी. बागुल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ जुलै रोजी कामकाज सुरू असताना कानमंडाळे येथील गट नंबर २३६ क्षेत्र हेक्टर ०.३५ आर पोटखराबा हे. ०.०७ आर असे एकूण ४२ आर या नवीन अविभाज्य शर्तीच्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी मुद्रांक विक्रेता किरण क्षीरसागर व पक्षकार उत्तम खंडू केदारे, रा. कानमंडाळे खरेदीखताचा दस्त सादर केला. या दस्तासोबत अपर जिल्हाधिकाऱ्यांचा खाडाखोड केलेला खोटा परवानगी आदेश जोडलेला होता.याबाबत शंका आल्याने आपल्या रजेच्या काळात लिपिक सुभाष भंडारी यांच्याकडे पदभार होता. या काळात काही दस्त नोंदविला आहे का? याची चौकशी केली असता दि. १२ ते २२ मे १४ या कालावधीत खोटे परवानगी आदेश हजर करून खरेदी झाल्याचे उघडकीस आले. यामुळे शासनाचा महसूल बुडाला.याबाबत चांदवड पोलिसांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली एच.बी. कदम, श्रीमती सी. व्ही. कऱ्हाड हे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
फसवणूक : अपर जिल्हाधिकाऱ्यांचे खोटे आदेश दाखवून जमीन खरेदी
By admin | Updated: July 26, 2014 00:54 IST