नांदगाव : तालुक्यातील मांडवड येथील आदिवासी महिलांनी शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार केल्याने दोन महिला दुकानदारांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तालुक्यात अनेक ठिकाणी शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने तहसिलच्या पुरवठा विभागाच्या कारभाराबाबतच संशय व्यक्त केला जात आहे. मांडवडच्या आदिवासी महिलांनी त्यांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या नांदगाव तहसिल कार्यालयाने तेथील स्वस्त धान्य दुकानदार शकुंतला अहेर, मुनवर सुलताना यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी न्यायालयाने संशयितांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, गेल्या दिवसांपासून तालुक्यातून शिधापत्रिकांवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. जामदरी, बुरकुलवाडी, कऱ्ही येथील ग्रामस्थांकडूनही तक्रार अर्ज आल्याने केवळ धान्य दुकानदारांपुरतेच हे प्रकरण मर्यादित राहिले नसून तहसील कार्यालय व पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मांडवडच्या महिलांनी गेल्या पंधरवड्यात पाच हजार रुपये घेऊन रेशनकार्ड दिले जाते अशी तक्रार तहसीलमध्ये केलेल्या आंदोलनात केली होती.
मांडवड येथील स्वस्त धान्य दुकानदारांना कोठडी
By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST