मालेगाव : येथील मालेगाव शहर स्वस्तधान्य दुकानमालक व सेल्समन संघटनेची बैठक संघटनेचे अध्यक्ष निसार शेख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी शासन स्वस्तधान्य दुकानदार व रॉकेल परवानाधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आॅल महाराष्ट्र फेअर शॉपकिपर्स फेडरेशन पुणे यांच्या अहवानानुसार १ आॅगस्टपासून राज्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानमालक व रॉकेल परवानाधारक संपावर जाणार आहेत. बैठकीत त्यास पाठिंबा देण्यात आला. याबाबत अपर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व धान्य वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, परवानाधारकांचे संपूर्ण ग्रामीण शालेय पोषण आहार व इतर प्रलंबित देयके सरकारने अदा करावे, साखरेचे प्रलंबित कमिशन द्यावे, परवानाधारकांना हमालीसह माल दुकानापर्यंत पोहोच करावा, नवीन परवानाधारकांना सन २००० चे सहा हजार ते आठ हजार युनिट संख्येची अट रद्द करून पंधरा हजारापर्यंत करावी, केसरी कार्डावरील रेशनिंगचे धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे, एक गॅस सिलिंडरची अट रद्द करून त्या शिधापत्रिका-धारकांनादेखील केरोसिन कोटा उपलब्ध करून देण्यात यावा, परवानाधारकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशा रितीने त्यांना कमिशन किंवा मासिक ३५ हजार रुपये मानधन द्यावे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. बैठकीस भगवान आढाव, सचिव रवींद्र पगारे, उपाध्यक्ष किरण काथे, ग्रामीण संघटना अध्यक्ष जितू पाटील, पद्माकर पाटील, अब्दुल बाकीर, वसंतराव पाटील, शरद म्हसदे, प्रवीण शेवाळे, राकेश पाटील, सिराज अहमद आदि उपस्थित होते, असे भगवान आढाव यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
स्वस्तधान्य दुकानदार संपावर
By admin | Updated: August 1, 2016 01:36 IST