येवला : गवंडगाव येथे लागलेल्या आगीत चार लाखांचा ऐवज भस्मसात झाल्याने अडचणीत आलेल्या देवराज भागवत या शेतकऱ्याला लोकनेते नारायणराव पवार नागरी पतसंस्थेच्या वतीने सोमवारी दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. शुक्रवारी देवराज भागवत यांच्या वस्तीवर लागलेल्या आगीत चाळीत ठेवलेल्या मक्याचा चारा भस्मसात झाला होता. झापच्या लगत असणाऱ्या शेडलाही आग लागल्याने यामध्ये ठेवलेल्या ५० हजार रुपये किमतीचे ठिबक सिंचनाचे सर्व सामान, चार ट्राली मका, आगीच्या भक्षस्थानी पडला. आगीत एकूण चार लाखांचे नुकसान झाले होते. सोमवारी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार यांनी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दहा हजारांचा धनादेश दिला. यावेळी त्याच्यासमवेत जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, पतसंस्थेचे चेअरमन अप्पासाहेब खैरनार, जनार्दन खिल्लारे, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
आगीत चार लाखांचा चारा, औजारे भस्मसात
By admin | Updated: November 16, 2015 22:30 IST