नाशिक : जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांमध्येच स्वयंसेवी संस्थांना कामे करण्याची करण्यात आलेली सक्ती, परिणामी खुंटलेला लोकसहभाग व टंचाईग्रस्त गावांवर झालेला अन्याय लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यासाठी ठरविण्यात आलेल्या निकषांमध्ये बदल करा, अशी आग्रही मागणी जिल्ह्णातील आमदारांनी जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत केली. नियोजन भवन येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्णातील सर्वच विषय व प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी जिल्ह्णात जलयुक्त शिवार योजनेची कामे चांगली झाली असली तरी, डिसेंबरमध्ये निवडण्यात आलेल्या गावांमध्येच कामे करा, असा आग्रह जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांकडे धरला. परिणामी ज्या गावांची निवड झालेली नाही, अशा गावांमध्ये लोकसहभाग तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जलयुक्तची कामे होऊ शकलेली नाहीत, असे सांगितले. आमदार अनिल कदम यांनीही, जलयुक्तची कामे करण्यासाठी ५० टक्क्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्येच घेण्याची सक्ती दूर करून ज्या ज्या गावांची पाण्याची पातळी खालावली आहे त्या गावांमध्ये जलयुक्तची कामे घेण्यात यावी, अशी मागणी केली. आमदार जयंत जाधव यांनी जलयुक्तच्या कामांसाठी शासनाकडे आणखी निधीची मागणी करावी, अशी सूचना केली. आमदार फरांदे यांनी जिल्हा रुग्णालयातील बंद पडलेल्या सीटी स्कॅनचा विषय त्याचबरोबर शहरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या तसेच गोदावरीच्या वाहून गेलेल्या भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तर राजाभाऊ वाजे यांनी दुष्काळी परिस्थितीत एकही तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या नसल्याबद्दल खंतव्यक्त करून बायोमॅट्रिक शिधापत्रिका तत्काळ लागू करावी, गोरगरिबांना केरोसिन मिळावे, अशी मागणी केली. जे. पी. गावित यांनी सुरगाण्यात पाऊस सुरू झाल्यापासून वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे सांगितले. त्यावर येत्या दोन-तीन दिवसांत कामे सुरू करण्यात येणार असल्याचे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘जलयुक्त’चे निकष बदला
By admin | Updated: July 14, 2016 01:57 IST