नाशिक : जिल्ह्यातील पंधरा पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. ५) जाहीर करण्यात आली. त्यात नाशिक व चांदवडला सर्वसाधारण तसेच निफाडला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. तसेच मालेगाव व नांदगावला सर्वसाधारण महिला, तर येवल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आरक्षण सोडत जाहीर झाली.जिल्हाधिकारी आवारात नियोजन भवनात ही सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर,प्रांत शशिकांत मंगरुळे आदि उपस्थित होते. त्यात सुरुवातीला अनुसूचित जमातीच्या सात जागांची आरक्षण सोडण्यात आली. त्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमाती महिला राखीव झाले. यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सुरगाणा हे चक्राकार आरक्षणाने आधीच महिला राखीव झाल्याने उर्वरित एका जागेसाठी शासकीय कन्या शाळेतील विद्यार्थिनी पायल एकनाथ पालवे ही चिठ्ठी काढली. त्यात पेठ अनुसूचित जमाती महिला राखीव झाले. उर्वरित बागलाण, कळवण, दिंडोरी व सिन्नर पंचायत समिती सभापतिपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. त्याचप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चक्राकार आरक्षणानुसार निफाड व येवला पंचायत समिती सभापतिपद होते. त्यातील एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव काढण्यासाठी अमिषा जाधव या विद्यार्थिने चिठ्ठी काढली. त्यात येवला पंचायत समिती पद महिला राखीव झाले. सर्वसाधारण संवर्गासाठी नाशिक व चांदवड तर सर्वसाधारण महिला राखीव मालेगाव व नांदगावसाठी झाले. त्यात नांदगाव पंचायत समिती सभापतिपद महिला की पुरुष यासाठी पायल पालवे हिनेच पुन्हा चिठ्ठी काढली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अशोक जाधव, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तेज कवडे, शिवसेना नाशिक तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, कळवण शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, देवळ्याचे पंकज निकम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चांदवड सर्वसाधारण, निफाडला नागरिकांचा मागास प्रवर्ग
By admin | Updated: January 6, 2017 01:14 IST