धनंजय वाखारे नाशिकगोदाघाटालगत वसलेले मूळचे नाशिक म्हणून नव्या रचनेतील प्रभाग क्रमांक १३ ची ओळख आहे. पाच वेळा महापौरपदासह विविध सत्तापदे प्राप्त होऊनही या प्रभागातील गावठाण परिसर विकासाची कात टाकू शकलेला नाही. आता नाशिकचा ‘स्मार्ट सिटी’ अभियानात समावेश झाल्याने याच प्रभागातील जुने नाशिक परिसरात गावठाण पुनर्विकासाची योजना राबविण्याचे मोठे आव्हान येऊ घातलेल्या लोकप्रतिनिधींपुढे असणार आहे. प्रभागातील गोदावरी नदीचे प्रदूषण, पूररेषा बाधितांचे भवितव्य, काजीगढीची संरक्षक भिंत आदि प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकलेले नाहीत.नवीन प्रभाग रचनेत सध्याचा प्रभाग क्रमांक १३, २५, २७ आणि २९ यांचा काही भाग मिळून प्रभाग क्रमांक १३ ची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभागाची व्याप्ती रविवार पेठेतील हेमलता टॉकीजपासून ते कालिकेच्या अलीकडील गडकरी चौकापर्यंत असल्याने प्रभागातील लढत लक्षवेधी आणि चुरशीची ठरणार आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणावर जुन्या नाशिकमधील गावठाणाचा समावेश असल्याने इच्छुक उमेदवारांची कसोटी लागणार आहे. चार प्रभागातील काही भाग एकत्र केला असला तरी परिसरात गेल्या पाच पंचवार्षिक काळात सेना-भाजपा आणि कॉँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. २०१२ च्या निवडणुकीत राज ठाकरे लाटेवर स्वार होत मनसेनेही परिसरात मुसंडी मारली. मात्र, आता होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक आजी-माजी मातब्बर लोकप्रतिनिधी आमने-सामने येण्याची शक्यता असल्याने प्रभाग १३ ची निवडणूक ही संपूर्ण शहराच्या दृष्टीने सर्वाधिक चर्चेत राहणार आहे. अतिशय संवेदनशील म्हणूनही या प्रभागाकडे पाहिले जात असल्याने निवडणूक शाखेचीही कसोटी लागणार आहे. प्रभागात गावठाणाचा भाग मोठ्या प्रमाणावर असल्याने रचनात्मक प्रकल्प काही उभे राहू शकलेले नाहीत. परंतु, मूलभूत सोयी-सुविधांची ओरड मात्र कायम आहे. प्रभागात अस्वच्छता तर पाचवीला पुजलेली आहे. त्यातून नागरिकांची काही सुटका होऊ शकलेली नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता यामुळे नेहमीच आरोग्याचा प्रश्न भेडसावत असतो. गोदावरीनदीकाठच्या रहिवाशांचा पूररेषेबाबतचा धोका अद्यापही संपलेला नाही. काजीगढीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही. वाहनतळ ही मोठी समस्या कायम आहे. आता स्मार्ट सिटीअंतर्गत गावठाण पुनर्विकासाचे आव्हान आहे.नवीन प्रभाग १३ च्या परिसरातून आतापर्यंत कॉँग्रेसचे शांतारामबापू वावरे, पंडितराव खैरे, वत्सला खैरे, शाहू खैरे, भाजपाचे बंडोपंत जोशी, सतीश शुक्ल, विजय साने, प्रशांत आव्हाड, अशोक गोसावी, शिवसेनेचे विनायक पांडे, हरिभाऊ लोणारी, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, संजय चव्हाण, रंजना पवार, विनायक खैरे, सुमनताई बागले, मनसेचे अॅड. यतिन वाघ, मीनाताई चौधरी, सुरेखा भोसले, माधुरी जाधव यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आली त्यावेळी पहिली तीन वर्षे याच भागाला महापौरपदाचा बहुमान लाभला. शांतारामबापू वावरे हे सलग दोनदा महापौर झाले. त्यानंतर पंडितराव खैरे यांनी महापौरपद भूषविले. चौथ्या पंचवार्षिक काळात सेनेचे विनायक पांडे यांनी महापौरपदाची धुरा सांभाळली. तर चालू पंचवार्षिक काळात पहिली अडीच वर्षे मनसेचे अॅड. यतिन वाघ यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. याशिवाय, स्थायी समितीचे सभापतिपदी शाहू खैरे, विजय साने यांचीही कामगिरी लक्षवेधी राहिली. रविवार कारंजा, सराफ बाजार, मेनरोड, भद्रकाली परिसरात सेना-भाजपाचे वर्चस्व राहिले तर गावठाणात कॉँग्रेस-रा.कॉँचा प्रभाव राहत आला आहे.
गावठाण पुनर्विकासाचे आव्हान
By admin | Updated: November 15, 2016 02:11 IST