वणी/सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर यात्रोत्सवास भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. न्यासाचे विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी यांनी सपत्नीक विशेष महापूजा केली. रामनवमी ते हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमेपर्यंत यात्रोत्सव सुरू राहाणार असून, विशेष नियोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात दर्शनासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे.यात्रोत्सवाच्या सुरक्षेसाठी ९५ सुरक्षारक्षक, पाच बंदुकधारी सुरक्षारक्षक, महाराष्ट्र पोलीस व राज्य गृहरक्षक दल, २४ तास अग्निशमन दल सुविधा, प्रथमोपचार केंद्र, निवासी व्यवस्था व दोन वेळा महाप्रसाद, ११ ठिकाणी पिण्यासाठी पाणपोई तसेच मूल्यवान वस्तूंसाठी लॉकरची सुविधा, अखंडित वीजपुरवठ्यासाठी पाच जनित्रांची व्यवस्था, तातडीच्या रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका अशा सुविधांबरोबरच नांदुरी ते सप्तशृंगगडादरम्यान खासगी वाहनांना प्रतिबंध करून तीनशे बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या पायरीवर नारळ वाढविणे व तेल अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रोत्सवात भाविकांचा विमा उतरविण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. काही भाविक नवस फेडीसाठीही पदयात्रा करतात. मध्य प्रदेश, जळगाव, धुळे, नंदुरबार आदि भागातील भाविकांनी उन्हात हजेरी लावली. सप्तशृंगी देवीची विशेष सजावट करण्यात आली होती. जांभळ्या रंगाची ११ वारी पैठणी, अडीच मीटरची चोळी, वज्रटीक, गाठले, पितळ्या, गुलाबहार, सप्तशृंगी हार, नथ, कर्णफुले, सोन्याचा मुकुट, सोन्याचा कमरपट्टा, पायात तोडे, लिंबाचा हार, फुलांचा हार, सुवर्ण अलंकार अशा सजावटीत देवीचे रूप खुलून दिसत होते. आज यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुमारे पंचवीस हजार भाविकांनी हजेरी लावल्याची माहिती देण्यात आली. उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम भाविकांच्या हजेरीवर जाणवला.
चैत्रोत्सवाला प्रारंभ
By admin | Updated: April 16, 2016 00:17 IST