नाशिक : शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षिकेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शालेय समितीचे अध्यक्ष पी. वाय. कुलकर्णी यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या उंटवाडी येथील एका शिक्षिकेबाबत हा प्रकार घडला अशी तक्रार आहे. बुधवारी (दि. ५) संस्थेचे शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर यशवंत कुलकर्णी (पी.वाय.) (रा. तिडके कॉलनी, नाशिक) हे संस्थेत आलेले असताना त्यांनी शिक्षिकेचा विनयभंग केला. याप्रकरणी संबंधित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, शिक्षिकेशी अयोग्य वर्तन केल्याच्या आरोपावरून पी. वाय. कुलकर्णी यांना शालेय समितीच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पी. वाय. कुलकर्णी यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदाची उमेदवारी केली होती आणि त्यांचा या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. दरम्यान, शिक्षिकेच्या विनयभंगप्रकरणी पी. वाय. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याविषयावर काहीच बोलायचे नाही, असे सांगितले. या घटनेनंतरही शैक्षणिक आणि सावानाच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. (प्रतिनिधी)
प्रभाकर कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार आल्यानंतर तातडीने कार्यकारी मंडळाची सभा घेण्यात आली. त्यामध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, ती समिती तीस दिवसांत चौकशी अहवाल देणार आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा अहवाल ठेवून कार्यवाही केली जाणार आहे. गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांना संस्था पाठीशी घालणार नाही.- शशांक मदाने, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी.