नाशिक : शहरातील यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रमाचे आयोजन करून सोमवारी (दि.15)आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजरा करण्यात आला.
मल्लखांब आणि नाशिक यांचे वेगळे नाते आहे. कारण मल्लखांबाची मुहूर्तमेढ नाशिकच्या कोठुरे गावात बाळंभट देवधर यांनी रोवली आहे. दुसऱ्या बाजीराव पेशवे काळातील मल्लखांब खेळाचे आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर यांचे नाव घेतले जाते. मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. नाशिकमध्ये यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील हे मल्लखांबाचे राष्ट्रीय आणि विद्यापीठीय स्पर्धामध्ये सुवर्णपदक विजेते मल्लखांबपटू आहेत. त्याचप्रमाणे गेल्या पाच पिढ्यापासून आबासाहेब घाडगे मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहेत. तर यशवंत जाधव गेल्या २६ वर्षांपासून मल्लखांबाचे प्रशिक्षण देत आहेत. तब्बल १०४ वर्षांपासून वाटचाल करणाऱ्या यशवंत व्यायाम शाळेचे आणि मल्लखांबाचे नातेही संस्थेच्या स्थापनेपासून जोडलेले आहे. त्यामुळेच १५ जून या आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या निमित्ताने लॉकडाउन असूनही यशवंत व्यायाम शाळांच्या मल्लखांब विभागाच्या वतीने हा महत्वाचा दिवस साजरा करण्यात आला.