सिडको : अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. यंदाची निवडणूक ही दोन्ही गटांत समझोता करून बिनविरोध करण्याच्या हालचालीदेखील सुरू असल्यातरी दोन्ही गटातील करारात एकमत न झाल्यास अथवा यांच्यातील बोलणी फिसकटल्यास पारदर्शक निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.आयमाच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आयमाची निवडणूक याच महिन्याच्या २६ मे रोजी होत आहे. १२ मे रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून, १५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत यादीत सुधारणा करता येणार आहे. याच दिवशी ४ वाजता सुधारित यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. १९ मे रोजी अर्जाची छाननी आणि २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत असून, २३ मे रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २६ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया होणार असून, २८ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. ३० मे रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत निकालाची घोषणा आणि नवीन अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ होणार असल्याचे आयमाच्या वतीने सांगण्यात आले आहे.मागील निवडणुकीत विद्यमान पदाधिकार्यांच्या एकता पॅनल विरोधात विरोधी गटातील एकता पॅनल यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत विद्यमान पॅनलकडून निवडणुकीत पारदर्शकता नसल्याचा ठपका विरोधकांनी ठेवत नाराजी व्यक्त केली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत पुन्हा तोच मुद्दा न चिघळता उद्योजकांच्या हितासाठी निवडणूक ही बिनविरोध कशी करता येईल, याबाबत एका गटाकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु यावर अद्याप स्पष्ट भूमिका दिसत नसल्याने दोन्ही गटांकडील इच्छुकांनी आपापला संपर्क वाढवून मोर्चेबांधणीस सुरुवात केल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मागील निवडणुकीत बाद मतांचा मुद्दा हा कळीचा विषय ठरला होता. (वार्ताहर)
एकमत न झाल्यास निवडणूक अटळ आयमा : दोन्ही गटांत मोर्चेबांधणी सुरू
By admin | Updated: May 11, 2014 19:36 IST