इगतपुरी : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील टाके घोटी येथे अज्ञात ट्रकने स्वीफ्ट कारला कट मारल्याने कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली, तर इतर तीनजण गंभीर झाले. जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील सॅटेलाइट टॉवर, गोरगाव येथील पंचोली परिवार स्वीफ्ट कारने (क्र. एमएच २ पीडब्ल्यू ५३५८) इंदोरला जात असताना महामार्गावरील टाके घोटी शिवाराजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास एका अज्ञात ट्रकने यांच्या कारला कट दिल्याने स्वीफ्ट चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कारने पलटी घेतल्या. या अपघातात स्वाती मनोहर पंचोली (३८) या जागीच ठार झाल्या. तर तनय मनोहर पंचोली (१३), तनवी मनोहर पंचोली (११), चालक एहेतेशाम इकबाल सरदार (२५, सर्व रा. गोरेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मयत महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन घोटी येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)
टाके घोटीजवळ कार उलटून महिला ठार
By admin | Updated: November 13, 2016 01:10 IST