----
कर संकलनासाठी कार्यालय खुले
नाशिक - कोरेानामुळे कर संकलन अत्यंत घटले असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कर वसुलीची कार्यालये खुलीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रविवारीदेखील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचे काम सुरू आहे. अर्थात आताकुठे जानेवारी महिना असल्याने पुरेशा प्रमाणात घरपट्टी वसुली होत नसल्याचे वृत्त आहे.
----
सीबलजवळ साईड पट्ट्याची दुरवस्था
नाशिक - महापालिकेने सीबल हॉटेलजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ नुकतीच जलवाहिनी टाकली आहे. परंतु त्यानंतर जलवाहिनी बुजविल्यानंतर याठिकाणी मातीचे ढिगारे तयार झाले आहेत. वास्तविक याठिकाणी सपाटीकरण करून साईड पट्ट्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे. परंतु महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
-----
एमआयडीसीत रस्त्यावर कचराकुंड्या
नाशिक - महात्मानगर जलकुंभाकडून औद्योगिक क्षेत्र सुरू होत असताना मार्गावर ठिकठिकाणी कचरा साचला आहे. महापालिकेच्या वतीने नियमितपणे कचरा उचलला जात असला तरी परिसरातील अनेक रहिवासी आणि मार्गस्थ होणारे नागरिक या मार्गांवर अंधार असल्याची संधी साधून कचरा टाकत असल्याची तक्रार आहे. हा भाग पश्चिम विभागाच्या सीमेवर असला तरी सातपूर विभागाच्या अंतर्गत येत असून या विभागात तब्बल २०० कर्मचारी कमी असल्यानेदेखील लक्ष ठेवण्यात अडचण येत आहे. तथापि, संबंधितांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
----
विषय समित्यांचा अहवाल मागविला
नाशिक - महापालिकेच्या ज्या विषय समित्यांच्या निवडणुका उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने रद्द झाल्या आहेत, त्यांचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मागविला आहे. महापालिकेच्या इतिहासात उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने निवडणुका स्थगित हाेण्याची पहिलीच घटना महिनाभरापूर्वी घडली होती. शहर सुधार आणि आरोग्य वैद्यकीय समितीच्या सभापती तसेच उपसभापती पदाच्या निवडणुकीत दाखल अर्जांवरील सह्या या मूळ दस्तावेजाशी जुळत नसल्याने निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्यानंतर त्यासाठी महापालिकेच्या नगर सचिवांनी पाठपुरावा केला, मात्र आता त्याचा अहवाल मागविल्याचे वृत्त आहे.