येथील ग्रामपंचायत, विकास सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती आदी निवडणुकांसाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणा-या माजी जि.प. अध्यक्ष कर्मवीर कै. ग्यानदेव दादा देवरे व माजी जि.प. उपाध्यक्ष विश्वासराव देवरे यांच्या गटांत मोठी चुरस बघावयास मिळते. सद्य:स्थितीत कै. ग्यानदेव देवरे यांच्या गटाचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे तसेच विश्वासराव देवरे यांच्या गटाचे नेतृत्व माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे हे सांभाळत आहेत. चालू वर्षी ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक चुरशीची होण्यासाठी दोन्ही गटांकडून कंबर कसली होती. परंतु, गेल्या सात ते आठ वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, यासाठी गेल्या १५ दिवसांपूर्वी गावकऱ्यांंकडून बैठक बोलविण्यात आली होती. यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे असतानाच बोलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे; तर संपूर्ण राज्यात सदर प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली. परिणामी, निवडणूक आयोगाने दखल घेत संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द केली आहे. त्यामुळे तालुक्याचेच नव्हे; तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूकच रद्द झाल्याने उमराणे गावात स्मशानशांतता पसरली आहे. या निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी मनसुबे आखले होते. त्यादृष्टीने व्यूहरचनादेखील आखलेली होती. परंतु, सदर प्रकारामुळे निवडणूक स्थगित झाल्याने इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असून उमेदवारांसह कार्यकर्ते व मतदारांचा मोठा हिरमोड झाला आहे.
निवडणूक रद्द झाल्याने उमराणेत पसरली स्मशान शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:12 IST
उमराणे : गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीकडे वाटचाल सुरू असतानाच सरपंचपदाच्या लिलाव बोलीसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द केल्याने ऐन मतदानाच्या दिवशी गावात स्मशानशांतता पसरल्याचे दिसून आले.
निवडणूक रद्द झाल्याने उमराणेत पसरली स्मशान शांतता
ठळक मुद्दे उमेदवारांचा हिरमोड : मतदारांत नाराजी