नाशिक : शहर औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) विभागाच्या अभियंता पदाच्या भरतीची जाहिरात सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यात या पदासाठी शैक्षणिक पात्रता, एक वर्ष कामाच्या अनुभवाव्यतिरिक्त सॅप बिझनेस इंटीग्रेशन हा कोर्स अनिवार्य करण्यात आला आहे. या कोर्ससाठी इच्छुक उमेदवारांना तब्बल तीन लाख ८० हजार रुपये इतके शुल्क भरणे अनिवार्य केल्याने बऱ्याच पात्र उमेदवारांनी या भरतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही अट त्वरित रद्द केली जावी, या मागणीचे युवासेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सॅपचा कोर्स महाराष्ट्रात शिकविला जात नसल्याने राज्यात हा कोर्स केलेल्या उमेदवारांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे. त्यामुळे सिडकोने ही भरतीप्रक्रिया राबविताना ठरावीक भागाचाच विचार केल्या असल्याने बरेचसे सुशिक्षित बेरोजगार या भरतीप्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भरतीप्रक्रिया राबविताना सॅप कोर्ससारख्या जाचक अटी रद्द करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी युवासेनेकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवासेनेचे दीपक दातीर, सचिन बांडे, उमेश चव्हाण, पवन मटाले, आदित्य बोरस्ते, रवि आव्हाड, रुपेश पालकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकी भरतीतील ‘सॅप’ अट रद्द करा
By admin | Updated: January 20, 2016 23:40 IST