लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी बांधलेले अंदाज चुकवीत विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती होईल किंवा नाही, तसेच दोन्ही कॉँग्रेस एकत्र लढतील की स्वबळ आजमावतील याविषयी अस्पष्टता असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुकांनी भाऊगर्दी केली आहे. आपण यापूर्वी पक्षासाठी कशा प्रकारे त्याग केला याबद्दलचे प्रोफाईल वरिष्ठ नेत्यांना दाखविण्यात सर्वच पक्षांचे इच्छुक फिरताना दिसत आहेत. थोडक्यात आपल्याकडे पैसा, समाज, जातीपातीचे राजकारण आणि यापूर्वी केलेला त्याग अशा सूत्राभोवती उमेदवारीचे बाशिंग गुंफणाऱ्या सर्वपक्षीय इच्छुकांची भाऊगर्दी उसळू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारास आघाडी दिल्यामुळे महायुतीच्या आशा उंचावल्या आहेत. युतीच्या समीकरणांमध्ये येथील जागा भारतीय जनता पार्टीच्या वाट्यास असून, या पक्षाच्या उमेदवारीसाठी चांदवड विरुद्ध देवळा असा सामना होण्याची शक्यता आहे. युतीमध्ये मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा असून, तसे झाल्यास येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आघाडीच्या संसारात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्यास असलेला सदर मतदारसंघ कॉँग्रेसला द्यावा, अशी मागणी केली जात आहे. तसे झाले तरच विद्यमान आमदार शिरीष कोतवाल यांना कॉँग्रेसकडून रिंगणात उतरणे शक्य होईल. गतवेळी याच परिस्थितीमुळे कोतवाल यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे लागले होते. अर्थातच जर आघाडीत सदर जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडेच कायम राहिली आणि उत्तम भालेराव यांनी नकार दिला तर कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसे झाले नाही तर कोतवाल पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. थोडक्यात, यंदाची विधानसभा निवडणूक कोतवाल यांच्याभोवती केंद्रित होणार असून, त्यांना शह देण्यासाठी आपणच पर्याय ठरू शकतो, असे दाखवून देण्याची स्पर्धा सर्वच राजकीय पक्षांमध्ये रंगली आहे.
गुडघ्याला बाशिंग, पण...
By admin | Updated: July 17, 2014 21:59 IST