नाशिक : सिंहस्थात येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीसाठी तीन हजार बसेस सज्ज ठेवण्यात आल्या असल्या तरी केवळ पोलिसांच्या नाकाबंदीमुळेच शहरात बसेस सुरू ठेवणे महामंडळाला शक्य झाले नसल्याचा आरोप महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या नियोजनामुळे महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीण झालेच शिवाय प्रवाशांची गैरसोय झाली ती वेगळीच, असे आता महामंडळाकडूनच बोलले जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात उत्पन्नाची पर्वणी साधण्याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले होते. त्यासाठी राज्यातील विविध डेपोंमधील सुमारे १२००, तर राज्यातील इतर भागांतून सुमारे १८०० बसेस मागविण्यात आल्या होत्या. अंतर्गत वाहनतळापासून शहरात आणि वाहनतळापासून बाहेरची वाहतूक करण्याचे नियोजन महामंडळाने केले होते. सिंहस्थ काळात महामंडळाला सुमारे ५०० ते ७०० कोटींचे उत्पन्न मिळेल, असे नियोजन करण्यात आल्याचेदेखील महामंडळाने जाहीर केले होते; परंतु प्रत्यक्षात पहिल्या शाहीस्नानाप्रसंगी शहरात कुठेही परिवहन महामंडळाची बस दिसली नाही. सर्व बसेस या अंतर्गत वाहनतळ आणि त्र्यंबकेश्वर येथे बसेस रवाना करण्यात आल्या. ठक्कर आणि मेळा बसस्थानकावर निर्मनुष्य झाले होते. शहरात कुठेही बस दिसत नसल्याने राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकनजीकच असलेल्या बसस्थानकात भाविकांची प्रचंड गर्दी होती. परंतु त्र्यंबक तसेच पंचवटीत जाण्यासाठी एकही बस नसल्याने त्यांना पायपीट करावी लागली, तर काहींना रिक्षाचालकांनी अवाच्या सवा भाडे आकारून लुटले. विशेष म्हणजे महामंडळाने त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी आणि परतीसाठी महामंडळाने शंभर रुपयांच्या विशेष पासची व्यवस्था केली होती; परंतु प्रत्यक्षात शाहीस्नानाच्या दिवशी भाविकांना शहरात बसची वाट पाहावी लागली. भाविकांना बसच उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना त्र्यंबकेश्वर गाठणे कठीण झाले. ज्यांना बाह्य वाहनतळे माहीत होते त्यांनी कसेबसे वाहनतळ गाठले. मात्र शहरात परिवहन महामंडळाकडून प्रवाशांची निराशा झाली. त्यामुळे महामंडळाच्या बसेस कमी प्रवासी घेऊनच धावत होत्या. (प्रतिनिधी)
बसेस रिकाम्या; वाहनतळ सुनेसुने
By admin | Updated: August 29, 2015 22:51 IST