पेठ : शालेय शिक्षण पुर्ण करण्यासाठी राहत्या गावापासून दहा- पंधरा कि मी पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या आदिवासी सावित्रीच्या लेकींची पायपीट समग्र शिक्षा अभियान मानव विकास उपक्र मामुळे थांबली असून अतिदुर्गम अशा पाहुचीबारी परिसरातील सात ते आठ गावातील शाळकरी मुलींची सोय झाली आहे.पेठ तालुक्याच्या उत्तरेकडील पाहुचीबरी, म्हसगण, आंबे या मोठ्या गावांना माध्यमीक व उच्च माध्यमीक शिक्षणाची सुविधा असून या शाळांमध्ये तोरणमाळ, आंबे, शिवशेत, मोहदांड, करंजखेड, वीरमळ, घाटाळबारी, जाहुले आदी गावातील विद्यार्थी पायपीट करत शाळा गाठत असतात. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानातून फक्त मुलींसाठी मोफत बसची व्यवस्था करण्यात आली असून आता या मार्गावरून बस धावणार असल्याने शेकडो मुलींची पायपीट थांबणार आहे. शुक्र वारी पाहुचीबारी येथे प्रथमत: बसचे दर्शन झाल्याने मुख्याध्यापक अनिल देवरे, सरपंच सावित्री पाडवी, पोलीस पाटील अशोक मोरे यांचे सह विद्यार्थ्यांनी चालक - वाहकांचा सत्कार केला.पंचायत समिती सभागृहात झालेल्या मुख्याध्यापक आढावा बैठकीत या मार्गावर मानव विकास ची बस सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती. सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, माजी उपसभापती महेश टोपले आदींनी परीवहन मंडळाशी संपर्क साधून बस सुरू करण्याबाबत सुचीत केले.केवळ दळणवळणाची सुविधा नसल्याने अनेक मुलींवर शाळाबाह्य होण्याची वेळ आली असून मानवविकास सारख्या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे आदिवासी मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून असल्याची प्रतिक्रि या पालक व शिक्षकांनी व्यक्त केली.
बस सुरू झाल्याने आदिवासी मुलींची पायपीट थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 17:42 IST