सुरगाणा : तालुक्यातील अतिदुर्गम भागात खोकरविहीर (चिचपाडा) येथे प्राथमीक आरोग्य केंद्र लवकरच चालु करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी सुरगाणा येथील नायब तहसीलदार बकरे याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खोकरविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असून तीन ते चार वर्षांपासुन इमारत फक्त शोभेची वस्तू बनलेली आहे. या इमारतीत दरवाजे, खिडक्या, लाईटफिटीग, पूर्णता तुटून गेली आहेत. शासनाची कोट्यावधी रूपयांची इमारत धुळ खात पडली असुन तेथे एकही कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. निवासस्थानाची इमारत सुध्दा उपलब्ध आहे. तरी सुद्धा एकही कर्मचारी राहत नाही. या गावांतील वैद्यकीय अधिकारी हे दुसऱ्याच ठिकाणी कार्यरत असून पगार मात्र खोकरविहीर (चिचपाडा) या आरोग्य केंद्राच्या नावाने काढतात सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवाची आरोग्याच्या दृष्टीने हेळसांड होत असुन परिसरातील आदिवासी बांधवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपचारासाठी १५ ते २० कि.मी. जावे लागते. येत्या सात दिवसात कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी औषधसाठा व यंत्रसामुगी उपलब्ध झाली नाही तर जिल्हा परिषद नाशिक येथे धरणे आंदोलन व थाळीनाद करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रामजी गवळी, विजय कानडे, आवजी पालवी, राजेंद्र निकुळे, भास्कर वारडे, दोलत जाधव, सुरेश वारडे, बुधा म्हसे, बाळु पवार, केशव म्हसे, होनाजी भोये, मोतिराम भोये आदी उपस्थित होते.
खोकरविहीर आरोग्य केंद्राची इमारत धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:29 IST