नाशिक : बसपातून बाहेर पडलेल्या सुरेश माने यांनी नाशकात आंबेडकरी चळवळीच्या पुनर्रचनेचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर धावपळ करीत बसपाने आरक्षण बचाव परिषद जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्याचा प्रयत्न केला असला तरी, युनायटेड बहुजन रिपब्लिकन आंबेडकराईट्स मुव्हमेंटच्या माध्यमातून माने यांनी नाशिकच्या आंबेडकरी विचारांना मानणाऱ्यांना आपलेसे करून चर्चासत्र यशस्वी केल्याने बसपाने त्याचा धसका घेतला आहे. माने यांचे चर्चासत्र सामाजिक उपक्रम होता म्हणूनच तो यशस्वी झाला असून, पक्ष स्थापनेप्रसंगी त्यांना त्यांची ‘ताकद’ कळून येईल असे बसपाचे म्हणणे आहे. शहरात सलग दोन दिवस बहुजन समाज पक्षाच्या व त्यातल्या त्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक मंथन झाले. बसपाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश माने यांना पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या तक्रारीवरून त्यांना बसपातून काढून टाकण्यात आल्यानंतर माने यांनी राज्यात बसपाला पर्याय देऊ शकणारा स्वतंत्र पक्ष काढण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. बसपाच्या मूळ विचारधारेशी संबंधितांशी माने यांनी संवाद साधल्यानंतर बसपाच्या स्थानिक व राज्यस्तरीय नेतृत्वाविषयी असलेली नाराजी त्यांनी ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी बसपाचे राज्य अध्यक्ष विलास गरुड यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आरक्षण बचाव परिषद घेण्यात आली, त्याच दिवशी माने यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील आंबेडकरी चळवळीची पुनर्रचना, आगामी राजकीय वाटचालीचा सुतोवाच केला व दुसऱ्या दिवशी जाहीर चर्चासत्रात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी या नवीन पक्षाची घोषणा केली. त्यांच्या चर्चासत्राला मिळालेला प्रतिसाद पाहता तो नक्कीच बसपाच्या परिषदेपेक्षाही उत्स्फूर्त होता.
बसोपाच्या प्रतिसादाचा बसपाला धसका
By admin | Updated: July 31, 2015 23:38 IST