नाशिक : ‘इस देश को ना हिंदू-मुसलमान चाहिए... हर मजहब जिसे प्यारा हो वो इन्सान चाहिए’, ‘इन्सान का इन्सान से हो भाईचारा... ये मानवधर्म हमारा’ यांसारख्या भक्तिगीतांमधून मानवतेची व एकात्मतेची साद घालत काढण्यात आलेल्या सद्भावना यात्रेने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. मानवधर्म प्रणेते श्री सत्पालजी महाराज यांच्या मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने कुंभमेळ्यानिमित्त शहरात सद्भावना संमेलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी श्री सत्पालजी महाराज, माता श्री अमृताजी, श्री विभूजी महाराज व श्री सुयशजी महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली. तिगरानिया रोडवरून सकाळी ९ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. सुमारे पन्नास हजारांहून अधिक भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. जयशंकर गार्डन, पोद्दार स्कूल, ड्रीम सिटी चौक, व्यंकटेशन कॉलनी, शिवाजीनगर, विजय-ममता, द्वारका चौक, टाकळी फाट्यामार्गे पुन्हा संमेलनस्थळी येऊन शोभायात्रेचा समारोप झाला. महात्मा हरिसंतोषानंदजी, महात्मा कमलेशानंदजी, साध्वी आराधनाजी यांच्यासह गौतम भंदुरे, विजय काठे, विजय भंदुरे, जे. सी. गांगुर्डे, उत्तम बिडवे, भाऊसाहेब बोराडे, प्रशांत काश्मिरे आदिंनी नियोजन केले. (प्रतिनिधी)
द्वारकावरील भाविकांना प्रथमच मिरवणूक दर्शनसाधुग्राममधून निघणारी शाही मिरवणूक असो की आतापर्यंत निघालेल्या विविध संत-महंतांच्या मिरवणुका, या सर्व पंचवटी परिसरातूनच निघाल्या आहेत. संत सत्पालजी महाराजांची शोभायात्रा मात्र शंकरनगरमार्गे पोद्दार स्कूल व फेम चित्रपटगृहासमोरून काठे गल्ली सिग्नलमार्गे निघाल्याने या भागातील नागरिकांना प्रथमच सिंहस्थ पर्वानिमित्त भव्य शोभायात्रेचे दर्शन घडून आले.महाराजपुत्रांचा शोभायात्रेत पायी सहभागसदर शोभायात्रेत भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने संत सत्पालजी महाराज यांच्या रथाला मानवसेवा कार्यकर्त्यांनी कडे केले होते. महाराजांचे पुत्र विभुजी व सुयशजी या शोभायात्रेत पायी सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक मार्ग त्यांनी भाविकांसमवेत पायी चालून पूर्ण केला.