नाशिक : शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून शाळेच्या कार्यालयातच लाचेची रक्कम घेणाऱ्या महापालिकेच्या शाळा क्रमांक दोनच्या मुख्याध्यापक शैला प्रतापराव मानकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि़३) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक दौलत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंगवाडीतील हॅपी होम कॉलनीत मनपाची शाळा क्रमांक दोन आहे़ या शाळेत तक्रारदाराची तिन्ही मुले शिक्षण घेत होती़ मात्र या तिघांनाही खासगी शाळेत प्रवेश घेतल्याने शाळा सोडल्याच्या दाखल्याची आवश्यकता होती़ या दाखल्यांसाठी तक्रारदार शाळेच्या कार्यालयात गेले व त्यांनी मुख्याध्यापक मानकर यांच्याकडे दाखल्यांची मागणी केली़तक्रारदाराकडे मानकर यांनी प्रती दाखल्यासाठी ५०० रुपयांची मागणी केली़ तडजोडीअंती ही रक्कम एक हजार रुपये ठरल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ या तक्रारीनुसार शनिवारी सकाळी सापळा रचून मानकर यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आली़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
मनपा शाळेतील लाचखोर मुख्याध्यापकास अटक
By admin | Updated: September 4, 2016 01:18 IST