वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गुरूवारी येथील मोखाडा त्र्यंबक रस्त्यावरील मोरचुंडी येथे रस्ता खचला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक खोळंबली. या परिसरातील नद्यांना पूर आल्याने घराघरात पाणी शिरले तर अनेक रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. जव्हारहून मोखाडा येथून पुढे त्र्यंबक-नाशिकला येणाऱ्या मोरचुंडी नावाच्या पुलाच्या बाजूच्या रस्त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे प्रसंगावधान राखत येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जव्हारहून जव्हार फाटा (मोखाडा फाटा) पुलाची वाडी, धोंड माºयाचीमेट, तळवाडा फाटा मार्गे त्र्यंबकेश्वर गाठून पुढे नाशिककडे जाता येऊ शकते. त्यामुळे या मार्गाचा वापर करावा अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तालुक्याच्या दळणवळणच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा समजला जातो. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणारा हा राज्य महामार्ग असून त्र्यंबकेश्वर -जव्हार-पालघर तसेच पुढे जाऊन चारोटी नाका आमदाबाद हायवे ला जाऊन मिळतो पर्यायाने गुजरात प्रांताला जाऊन मिळतो. काल मध्य रात्रीपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. या पावसात मोखाडा तालुक्यातील मोरचुंडी येथे पुलाला जवळ रस्त्याला भले मोठे भगदाड पडले रात्री अचानक वाढलेल्या पावसाने ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
पावसामुळे मोरचुंडी रस्त्याला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:19 IST