नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सुमारे ३१ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर अवघ्या १२ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. शासनाकडून बहुतांश केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस मुबलक प्रमाणात असूनही ते घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांचे दररोजचे प्रमाण निम्म्याहून कमी असून, त्यामागे ८४ दिवसांचे निर्बंध तसेच कोरोनाचे घटलेले प्रमाण लसीकरणाच्या थंड प्रतिसादाला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. ज्या डोससाठी नागरिक पहाटे ३ पासून रांगेत उभे राहून दुपारी डोस मिळत होते, तेच डोस आता सहजपणे किंवा फारतर अवघ्या एक-दोन नंबरमागे मिळू लागले आहेत. सर्व केंद्रांवर दिसणाऱ्या रांगांचे चित्र आता जवळपास संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. एखाद्या सेंटरवर रांग असली तरी ती ५ ते ७ नागरिकांपेक्षा अधिक नसते. त्यामुळे लसीकरणासाठी गेल्यानंतर फार तर अर्ध्या तासात लसीकरण पूर्ण होत असल्याचे दिलासादायक चित्र नागरिक अनुभवत आहेत. मात्र, जिल्ह्यात कमी प्रमाणात लस उपलब्ध असतानाही जिथे ६० हजारांवर लसीकरण सुरू होते, तिथे आता लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही जिल्ह्यात हे प्रमाण ४५ ते ५० हजारांच्या आसपास राहत आहे. सध्याच्या थंड प्रतिसादामागे पहिला डोस घेतलेल्यांचे वाढते प्रमाण तसेच दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांच्या कालावधीचे निर्बंध कारणीभूत ठरत आहे.
इन्फो
दिवसाला १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट
पालकमंत्र्यांनी गुरुवारीच घेतलेल्या आढावा बैठकीत लसीकरणाचा वेग वाढविण्याचे आवाहन करतानाच दिवसाला १ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या तुलनेत सध्या होत असलेले लसीकरण जवळपास निम्मेच असल्याने लसीकरणाला दुप्पट वेग दिल्यास अपेक्षित परिणाम साधता येणार आहे.
इन्फो
जिल्ह्यात दुसरा डोस १२ टक्के, शहरात १७ टक्के
जिल्ह्याच्या तुलनेत शहरातील नागरिकांचे लसीकरण अधिक प्रमाणात असले, तरी ते फार अधिकदेखील नसल्याचे लसीकरणाच्या टक्केवारीतून दिसून येत आहे. जिल्ह्यातील पहिल्या डोसची टक्केवारी ३१ असून शहरातील पहिल्या डोसचे प्रमाण ३७ टक्क्यांवर आहे, तर जिल्ह्यात दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण अवघे १२ टक्के असताना शहरात दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण १७ टक्के आहे.
कोट
पुढील आठवड्यात वाढेल प्रमाण
गौरी-गणपती तसेच दुसऱ्या डोसमधील अंतराच्या निर्बंधांमुळे सध्या लसीकरणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी आहे. मात्र, लसींचा पुरेसा साठा असून, पुढील आठवड्यापासून लसीकरणाचे प्रमाण वाढू शकणार आहे.
- डॉ. अजिता साळुंखे, मनपा लसीकरण अधिकारी