नाशिक : नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या मासिक बैठकीत आवश्यक ती माहिती न मिळाल्याच्या निषेधार्थ संचालक प्रकाश सोनवणे यांनी बहिष्कार टाकून रविवारी (दि.२०) पतसंस्थेच्या कार्यालयासमोर काहीवेळ ठिय्या आंदोलन केले.यासंदर्भात आवश्यक ती माहिती न दिल्यास येत्या २५ जुलैला पतसंस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश सोनवणे यांनी दिला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी तयार करण्यात आलेल्या अहवालाची प्रत मागितली असता ती आपल्याला देण्यात आलेली नाही. तसेच पतसंस्थेचे तिमाही, सहामाही व वार्षिक बेरीज पत्रकाची मागणी व इतर महत्त्वाची कागदपत्राची प्रत उपलब्ध करून न दिल्यामुळे मी आजच्या मासिक सभेत पदाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सभासद व सोसायटी हितासाठी सभात्याग करीत असल्याचे प्रकाश सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच मागील बैठकीतील काही ठरावीक विषयांवरील मंजुरीची माहिती विचारूनही ती मिळालेली नाही. त्यामुळे येत्या २५ जुलैपर्यंत मागितलेली माहिती न मिळाल्यास आपण पतसंस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे प्रकाश सोनवणे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)