गिरीश जोशी मनमाडगोदावरी एक्स्प्रेसच्या लेडिज बोगीमध्ये ठरावीक बाकांवर खडूने ‘ पासधारक’ असे लिहून काही दैनंदिन ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य महिला प्रवाशांची दिशाभूल करून जागेबाबत अरेरावी करत असल्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. महिलांकडूनच महिलांवर करण्यात येणाऱ्या या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत आहे.मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस ही मनमाड शहर व परिसरातील दैनंदिन कामाकाजासाठी नाशिक व मुंबई येथे जा-ये करणाऱ्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी ठरली आहे. अगदी गर्दीच्या, सिझनच्या वेळी जागा मिळणारी हक्काची गाडी म्हणून परिसरातील प्रवासी गाडी लागण्यापूर्वीच फलाटावर हजर होत असतात.या गाडीने पुरुष प्रवाशांबरोबरच महिला प्रवाशांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दररोज फलाट क्रमांक ४ वर उभ्या असणाऱ्या या गाडीला रेल्वे इंजिनपासून शेवटची बोगी ही महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता ही बोगीसुद्धा काहीवेळा कमी पडत असल्याचे चित्र पहावयास मिळते.बहुतांश एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला बोगीतून प्रवास करणे पसंत करतात. या बोगीत दैनंदिन ये-जा करणाऱ्या काही महिलांनी ठरावीक बाकांवर खडूने ‘पासधारक’असा शब्द लिहून सर्वसामान्य महिला प्रवाशांची दिशाभूल चालवली आहे. इतकेच काय, तर मनमाडहून बसणाऱ्या काही महिला आपल्या लासलगाव व निफाड येथून बसणाऱ्या मैत्रिणींसाठी जागा राखून असतात. या बागीत त्यांच्या बसण्याच्या जागा निश्चित असून, या जागेवर बसणाऱ्या अन्य महिला प्रवाशांशी नेहमी वाद घालत असल्याचे पहावयास मिळते. काहीवेळा तर जागृत महिला ही बोगी महिलांची की पासधारकांची या वादावर निर्णय देण्यासाठी थेट गाडीच्या गार्डला डब्यापर्यंत पाचारण करत असल्याचे प्रकार घडले आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने लक्ष घालून कार्यवाही करावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पासधारकांची अरेरावी
By admin | Updated: January 12, 2016 22:36 IST