नाशिक : अनैतिक संबंधातून प्रेयसीचा पती दशरथ ठमके यास मद्य पिण्याच्या बहाण्याने नेऊन धारदार शस्त्राने वार करून ठार मारणारा प्रियकर गणेश वसंत गरड (२२, रा़ नागचौक) व साथीदार सुनील रामदास अहिरे (२९, रा़ फुलेनगर) या आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी मंगळवारी (दि़२५) जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात तिघा संशयितांची निर्दोष मुक्तता केली़ सरकारी वकील रवींद्र निकम यांनी बारा साक्षीदार तपासले़ पेठरोडवरील गजानन चौकातील रहिवासी ठमके याच्या पत्नीचे आरोपी गरडसोबत प्रेमसंबंध होते़ हे ठमकेला समजल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले होते़ त्यावेळी ठमके याने गरड यास माझ्या पत्नीचा नाद सोडून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती़ या गोष्टीचा राग गरडच्या मनात असल्याने २१ आॅक्टोबर २०१७ साली रात्रीच्या सुमारास ठमके यास दारू पाजण्याच्या बहाण्याने पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट यार्ड येथील पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेला़ आरोपी गरडसोबत सुनील रामदास अहिरे, राहुल ऊर्फ भुºया भीमा लिलके (१९, रा़ एरंडवाडी), उमेश डॅनियल खंदारे (२४, रा. पंचवटी) व सुशील उर्फ श्याम मधुकर बागुल (३१, रा़ दिंडोरी रोड) हे साथीदारदेखील होते़ ठमके यास दारू पाजल्यानंतर आरोपी गरड व त्याच्या साथीदारांनी चॉपरने छातीवर, गळ्यावर व पोटावर वार करून ठार मारले़ यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोरी बांधून मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला. पंचवटी पोलीस ठाण्यात दशरथ ठमके हा बेपत्ता असल्याची तक्रार भावाने केली होती़ तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, निरीक्षक आनंदा वाघ व उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी आरोपी गरडला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला, त्याने मृतदेह पाण्याचा टाकीत टाकल्याची कबुली दिली होती.सरकारी वकील रवींद्र निकम यांनी केलेला युक्तिवाद तसेच परिस्थितीजन्य पुरावे व तपासलेले बारा साक्षीदार याआधारे दोघांनी दशरथ ठमकेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. न्यायाधीश गिमेकर यांनी आरोपी गरड व अहिरे या दोघांनाही जन्मठेप आणि प्रत्येकी ३० हजार रुपये दंड ठोठावला. गुन्हा शाबित होण्यासाठी पैरवी अधिकारी पोलीस नाईक एस. एल. जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. शिंदे, पोलीस शिपाई आर. आर. जाधव यांनी प्रयत्न केले़
प्रेयसीच्या पतीला मारणाऱ्या प्रियकरासह दोघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:10 IST