सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्यावर स्कॉर्पिओ जीपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात नाशिकरोड येथील दोघे जागीच ठार झाले. पांगरी शिवारात रविवारी दुपारी चारच्या सुमारास सदर अपघात झाला. जेलरोड, नाशिकरोड येथील शिवाजी देवराम कुशारे (५५) व नंदकिशोर खंडेराव सहाणे (६२) हे आपल्या बजाज बॉक्सर मोटारसायकलने (एमएच १५ एएक्स ७३३०) कोपरगाव येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी काम आटोपून ते नाशिकरोडकडे परत येत असताना सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ जीपने (एमएच २० वाय ५४७०) दुचाकीला जोरदार धडक दिली. स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पांगरी शिवारातील हॉटेल शीतलजवळील वळणावर सदर अपघात झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या कडेच्या गटारीत उलटली. दुचाकीवरील कुशारे व सहाणे जागीच ठार झाले, तर स्कॉर्पिओ उलटल्याने त्यातील तिघे जखमी झाले. जखमी मुंबई येथील रहिवाशी असून त्यांना अधिक उपचारासाठी सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत दोघांचे पालिका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भास्कर महाले, शिवाजी माळी अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)
स्कॉर्पिओच्या धडकेत नाशिकरोडचे दोघे ठार
By admin | Updated: March 16, 2015 00:38 IST