मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. १ व ४ मध्ये राबविण्यात आलेल्या बोगस नळशोध मोहिमेत चार लाख नऊ हजार ९०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. शहरात मनपातर्फे जानेवारी महिन्यापासून अनधिकृत नळशोध मोहीम राबविण्यात आली. यात आज महापालिकेच्या प्रभाग-१ कार्यालयाच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ३० नळजोडण्या अधिकृत करताना दोन लाख ४६ हजार रुपये दंड वसूल करण्यात येऊन या जोडण्या अधिकृत करण्यात आल्या. याचदरम्यान प्रभाग-४ कार्यालयाच्या हद्दीतील कारवाईत एक लाख ६३ हजार ९०० रुपये दंड वसूल करताना २२ नळजोडण्या अधिकृत करण्यात आल्या. यावेळी तीन नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. येथील महापालिका कोणतीही मोहीम ही दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त राबवत नसल्याचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. मात्र येथील आयुक्तांनी ही मोहीम राबविताना ही परंपरा खंडित केली आहे. यात अनधिकृत नळशोध मोहिमेला एक महिना झाला असून, एक कोटीपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.या मोहिमेत जनतेचा कळवळा दाखवत काही नगरसेवकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. (प्रतिनिधी)
बोगस नळशोध मोहीम; चार लाखांची वसुली
By admin | Updated: February 9, 2016 22:34 IST