लोकमत न्यूज नेटवर्क ममदापूर : मालेगावच्या शिकाऱ्यांनी सिनेस्टाइल पद्धतीने ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रालगत हरणाची भरदिवसा शिकार केल्याचा प्रकार घडला. परिसरात गोळीबार झाला. ही बाब मेंढपाळाच्या लक्षात आली. मेंढपाळासह संतोष चव्हाण या राजापूर येथील युवकाने आरडाओरड केल्यानंतर मदतीला धावलेल्या अन्य तीन युवकांनादेखील शिकारींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यातील एका तरुणाच्या कपाळावर बंदुक रोखत पाच शिकाऱ्यांपैकी चौघांनी गाडीतून पलायन केले; मात्र या धाडशी युवकांनी एकाला गाडीतून खेचले आणि ताब्यात घेतले. शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कोळम - ममदापूर चौफुलीजवळ मालेगावचे पाच शिकारी काळविटांची शिकार करण्यासाठी दुपार पासुन दबा धरून बसलेले होते. त्यानी एक पाच ते सहा वर्षे वयाच्या काळवीटाची बंदुकीच्या सह्याने शिकार केली. काळवीट इंडिका कार मध्ये टाकण्यासाठी उचलतांना ही घटना रस्त्यावरून जाणाऱ्या राजापूर येथील संतोष चव्हाण यांनी पाहीली. आरडाओरड करून शेजारच्या वस्तीवरील लोकांना आवाज दिले तेव्हा राजेंद्र आवारे व नाना चव्हाण हे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा शिकारी आलम हारुण दस्तगीर (२४), मालेगाव ,बबल्या ऊर्फ शेरू रेहमतुल्ला, गाडीचा चालक, व स्थानिकामध्ये बाचाबाची झाली या वेळी शिकारीनी या तरु णाच्या कपाळावर बंदुक लावली. व पळ काढला. परंतु या वेळी दस्तगीरला गाडीच्या दरवाजातून संतोष चव्हाण, राजेंद्र आवारे, नाना चव्हाण यांनी खाली ओढून घेतला. या झटापटीत अन्य चौघे शिकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक जे. के. शिरसाठ,वनरक्षक पाटील, आरखडे,पी.बी.वाघ, शेख तसेच वन्यजीव समितीचे सदस्य दाखल झाले. तोपर्यंत कोळम ममदापुर, खरवडी, भारम, कोळम येथील तरूणांनी आरोपीला यथेच्छ चोप दिला. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ हजर होते.
ममदापूरजवळ काळविटाची शिकार
By admin | Updated: June 11, 2017 00:55 IST