नाशिक : सहकार क्षेत्रातील आर्थिक अनियमितताप्रकरणी संचालकांना दोषी धरून त्यांच्यावर दहा वर्षांची निवडणूक बंदी करण्याचा अध्यादेश लागू करून भाजपाने राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा बॅँकांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत मात्र भाजपा आणि शिवसेनेत सत्तेसाठी शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीत असलेले जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे हे आता शिवबंधनात अडकले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सहकाराची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या जिल्हा बॅँकेच्या महत्त्वाच्या पदावर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. इतकेच नव्हे तर उपाध्यक्ष पदावरही शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याचे बोलले जाते. साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचाच अध्यक्ष व्हावा यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. जिल्हा बॅँकेत भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह आमदार अपूर्व हिरे, आमदार सीमा हिरे, अद्वय हिरे, कृषी सभापती केदा अहेर, माजी आमदार माणिकराव कोकाटे अशी भली मोठी फळी असतानाही भाजपाला जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना बसविता आले नव्हते. थेट जिल्हा बॅँकेच्या सभागृहात अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्यात आला होता. आता जिल्हा बॅँकेत शिवसेनेचे जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, किशोर दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे, आमदार अनिल कदम असे अवघे चार संचालक आहेत. तरीही त्यांच्या ताब्यात जिल्हा बॅँकेची महत्त्वाची दोन्ही पदे आहेत. (प्रतिनिधी)
कर्जाआडून भाजपाचा शिवसेनेवर ‘निशाणा’?
By admin | Updated: October 21, 2016 03:09 IST