किरण अग्रवाल नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात यंदा ‘युती’ व ‘आघाडी’ अंतर्गत अधिक लढती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होऊ घातल्या आहेत. पक्षांतराच्या वावटळीचा फटका बसूनही अनेक ठिकाणी ‘आघाडी’ दमदारपणे निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहे. विशेषत: शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
सद्यस्थितीत नाशिक व नगर जिल्ह्यातील एकूण २७ पैकी १४ जागा ‘युती’कडे, तर १२ ‘आघाडी’कडे आहेत. यातही ‘युती’ अंतर्गत सर्वाधिक नऊ जागा भाजपने राखलेल्या असून, ‘आघाडी’त ७ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. या अर्थाने म्हणजे, अंकगणिताने भाजप व राष्ट्रवादीचेच वर्चस्व असताना पक्षांतरामळे यंदा ‘युती’त अधिकची भर पडून गेली आहे.राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड भाजपत, तर काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे व निर्मला गावित शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘युती’मध्ये भाजपतर्फे लढविल्या जाणाऱ्या जागांचा टक्का वाढून गेला आहे. नगर जिल्ह्यात भाजप शिवसेनेपेक्षा दुप्पट (८) जागा लढवत आहे. दुसरीकडे ‘आघाडी’मध्ये दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल १८ जागा लढत असून, काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या ८ जागा आल्या आहेत. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीतच अधिक सामने होणार आहेत.
नगर जिल्ह्यात दुरंगी लढतीअहमदनगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत शिवसेना-भाजपला बंडखोरी शमविण्यात यश आले आहे. १२ पैकी ११ ठिकाणी दुरंगी लढत असून, कोपरगाव मतदारसंघात मात्र चौरंगी सामना पहायला मिळणार आहे. तिथे भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविरुद्ध भाजपचे नगराध्यक्ष विजय वहाडणे अपक्ष मैदानात आहेत, तर राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्याविरु द्ध काँग्रेसचे राजेश परजणे (सुजय विखे यांचे मामा) मैदानात आहेत. नेवाशात माजी आमदार शंकरराव गडाख यांना राष्टÑवादीने पाठिंबा दिला आहे. उसाचा व सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार असून, आतापर्यंत झालेल्या प्रचार सभांमध्ये स्थानिक वगळता अन्य मुद्द्यांवरच चर्चा झाल्याने मतदारही संभ्रमातच असल्याचे दिसते. त्यामुळे शेवटच्या चरणात प्रचार कोणत्या मुद्द्यांवर पोहोचतो हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.पवारांचे नातू रिंगणातअहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा सामना भाजपचे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी होत आहे. लोकसभा निवडणुकीत मावळमधून पार्थ पवार यांना पराभव पाहावा लागल्यामुळे रोहित यांच्यासाठी सारे बळ एकवटून राष्ट्रवादी कामाला जुंपल्याने काट्याची लढत होत आहे.मनसे फॅक्टरनाशिक जिल्ह्यात मनसेने सहा जागी उमेदवार उभे केल्याने पूर्वलक्षी प्रभावाचा विचार करता मनसे फॅक्टर पुन्हा चर्चेत येऊन गेला आहे. नाशिक पूर्वमधून राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मनसेने घोषित उमेदवारी मागे घेतली आहे. नाशिक मध्यमधून मनसेचे माजी आमदार नितीन भोसले लढत असले तरी, अचानक मिळालेल्या उमेदवारीमुळे इंजिनच्या गतीने ते धावताना दिसत नाहीत. मनेसेपेक्षा अधिक जागांवर वंचित बहुजन आघाडी रिंगणात आहे; पण अपरिचित चेहºयांमुळे त्यांचा प्रभाव दिसून येत नाही. माकप नाशिक पश्चिम व कळवणच्या जागांवर लढत आहे; परंतु यंदा आहे ती जागाही राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवारामुळे अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.