नाशिक : निवडणूक लोकसभा-विधानसभेची असो अथवा महानगरपालिकेची, जुन्या नाशिकमधील बी. डी. भालेकर विद्यालयातील मतदान केंद्र नेहमीच संवेदनशील म्हणून पाहिले गेले आहे. मोठ्या संख्येने दलित आणि मुस्लीम मतदान असलेल्या या मतदान केंद्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यावर ७१५ मतांची आघाडी घेतल्याचे दिसून आले.बी. डी. भालेकर विद्यालयातील मतदान केंद्रावर सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी शिवसेनेने या केंद्रावर मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावेळचे शिवसेनेचे महानगरप्रमुख नीलेश चव्हाण यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला होता. बी. डी. भालेकर विद्यालयातील मतदान केंद्र नेहमीच संवेदनशील राहिले आहे. याठिकाणी मतदान संपण्याचा कालावधी अवघ्या तासांवर येऊन ठेपतो तेव्हा मतदारांच्या झुंडीच्या झुंडी मतदानासाठी येण्याचा आणि रात्री उशिरापर्यंत मतदान होण्याचा इतिहास आहे. भालेकर विद्यालयात नेहमीच होणारी तणावाची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात केला जात असतो. यंदाही भालेकर विद्यालयाभोवती पोलिसांचा गराडा पडलेला होता. यावेळीही सायंकाळी ४ वाजेनंतर मतदारांनी मतदानासाठी एकदम गर्दी केली होती. परिणामी, मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्राधिकार्यांनी विद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून आतमध्ये असलेल्या मतदारांनाच मतदानाची मुभा दिली होती. याठिकाणी उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. आता निवडणुकीचे मतदान केंद्रनिहाय निकाल बाहेर येत असून भालेकर विद्यालयातील केंद्रात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना २३८७ मते मिळाली, तर शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना १६७२ मते मिळाली. भुजबळांनी गोडसे यांच्यावर ७१५ मतांची आघाडी घेतल्याचे दिसून आले. सूचना-बातमीत बी. डी. भालेकर विद्यालयात मतदानाच्या दिवशीचे काढलेले छायाचित्र वापरता येऊ शकेल.
भालेकर विद्यालयाच्या केंद्रात भुजबळांची गोडसेंवर आघाडी संवेदनशील मतदान केंद्र : उशिरापर्यंत चालले होते मतदान
By admin | Updated: May 21, 2014 23:57 IST