नाशिकरोड : परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा व दुभाजकांमधील छोट्या-मोठ्या झाडाला जैन सोशल ग्रुप व नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेच्या वतीने लाल, पांढरा व पोपटी रंग मारल्याने परिसराच्या सौंदर्यात चांगली भर पडली आहे. यामुळे वृक्षाचे किडीपासुन संरक्षण होणार असून त्यांचे आयुष्यमान देखील वाढणार आहे.वाढते प्रदूषण, दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आपल्यासमोर येऊन उभा ठाकला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जो-तो आपल्या परीने पुढाकार घेत प्रयत्न करीत आहे; मात्र अनेक ठिकाणचे ‘वृक्षारोपण हे फोटोसेशन’ पुरतेच राहत असल्याने वृक्षारोपणासोबत त्यांचे संवर्धन काळाची गरज ठरले आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारा जैन सोशल ग्रुप व नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक यांनी फोटोसेशनला फाटा देत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारून एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ चे क्रीडांगण, आर्टिलरी सेंटररोड व अनुराधा चौकापासून बिटकोपर्यंत दुतर्फा व रस्ता दुभाजकांमध्ये असलेल्या छोट्या-मोठ्या वृक्षांना रंग मारण्याची मोहीम हाती घेतली आहे. जमिनीलगत असलेल्या वृक्षाच्या खोडाला कीड लागू नये म्हणून गेरू (लाल), त्यावर वाळवी लागू नये म्हणून चुना (पांढरा) व त्यांच्यावर आकर्षक दिसावे म्हणून पोपटी हिरवा रंग असे तीन पट्टे मारले आहेत. यामुळे त्या परिसराचे चित्र पालटत असून स्वच्छ व आगळेवेगळे दिसत आहे. छोट्या झाडांना तग धरण्यासाठी काठी किंवा काही ठिकाणी ट्री गार्डदेखील लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
रस्त्याच्या सौंदर्यात पडणार भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 00:39 IST