नाशिक : घराचे बांधकाम सुरू असताना आपल्या बाजूने आलेला घराचा स्लॅब काढून घेण्यास सागितल्याने संतप्त झालेल्या तिघांनी शेजाऱ्याला मारहाण केल्याची घटना शिंगवे बहुला येथील अंबडवाडी भागात घडली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देवराम निसाळ (३०) , राजूबाई देवराम निसाळ, (५०, रा. दोघे अंबडवाडी) एक मिस्त्री अशी संशयितांची नावे असून त्यांनी प्रथमेश विजय झाडे (वय २६, अंबडवाडी शिंगवेबहुला) यांना मारहाण केल्याची घटना घडली. झाडे संशयितांच्या घराचे बांधकाम सुरू असताना त्यांना आपल्या बाजूने बाहेर निघालेला भाग काढून घेण्यास सांगत असताना संतप्त झालेले संतोष निसाळ याने डोक्यात वीट मारल्याने झाडे जखमी झाले. तर अन्य दोघांनी शिवीगाळ करीत, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे झाडे यांची आई मदतीस आली असता तिघा संशयितांनी तिलाही मारहाण केली. याप्रकरणी प्रथमेश झाडे यांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच फिर्याद दिली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.