नाशिक : वाहनचालकांकडून नियमांच्या होणाऱ्या पायमल्लीस आळा बसावा तसेच वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी कडक पावले उचलली आहेत़ बुधवारपासून (दि़ १६) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीचालकांकडून नवीन सुधारित दरानुसार दंडवसुली केली जाणार असून, दंडाची ही रक्कम सद्यस्थितीतील दंडाच्या तिप्पट आहे़ त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना एकतर विचार तरी करावा लागेल; वा तिप्पट दंड भरण्याची तयारी तरी ठेवावी लागेल़ शहरात वाहनचालकांकडून सिग्नल तोडणे, एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जाणे, वाहनांची कागदपत्रे, लायसन्स जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे याबरोबरच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे़ या प्रवृत्तीमुळे अपघातांची संख्या वाढत चालली असून, त्यास नागरिक बळी पडत आहेत़ वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी तसेच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मंगळवारी रावसाहेब थोरात सभागृहात पोलीस आयुक्तालयातर्फे वाहतूक परिषद -२०१६ चे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस आयुक्त वाहतूक समस्या जाणून घेत असतानाच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे वाहनचालक सुसाट झाल्याचे मत काही नागरिकांनी नोंदविले होते़ तसेच जोपर्यंत वाहनचालकांना कायद्याची जरब बसत नाही वा खिशाला झळ लागत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याचे मतही मांडण्यात आले़ त्यामुळे आयुक्तांनी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून बुधवारपासून शासनाच्या नवीन सुधारित नियमानुसार दंडवसुली करण्यात येणार असल्याचे जाहीर केले़ विशेष म्हणजे सुधारित नियमात दंडामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे़ विनानोंदणी वाहन रस्त्यावर चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, परवाना नसलेल्या व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे, वाहनाचा विमा काढलेला नसणे, भरधाव वाहन चालविणे यासाठी पूर्वीच्या दंडापेक्षा तिप्पट वाढ करण्यात आली आहे़ तर इतर नियमांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली असून, यापुढे नवीन नियमानुसार दंडवसुली केली जाणार आहे़
सावधान! आता तिप्पट दंडवसुली
By admin | Updated: November 16, 2016 01:15 IST