.नाशिक : सज्जनांचे रक्षण करत दुष्टांचे निर्दालन करण्याचा सामाजिक संदेश देणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (दि.१४) गंगापूर परिसरातील बालाजी मंदिराचा परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला. येथील शंकराचार्य न्यासच्या बालाजी मंदिरात हजारो भाविकांनी दिव्याला दिवा लावून लक्ष लक्ष दिव्यांच्या ज्योती प्रकाशमान केल्या. भाविकांनी गोविंदा... गोविंदा...चा जयघोष करून एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले. त्रिपुरारी पौर्णिमेबाबत सांगितल्या जाणाऱ्या लोककथेनुसार त्रिपूर नावाच्या उन्मत्त असुराचा या दिवशी अंत करण्यात आला होता. त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. त्रिपूर असुराचा संहार झाल्याबद्दल ही पौर्णिमा दीप पेटवून साजरी केली जाते. कार्तिकी पौर्णिमेला प्रदोषकाळी त्रिपुरासुराला ठार मारल्याने आनंदोत्सव म्हणून दिवाळीप्रमाणेच मंदिरे, नदीकिनारी दीप प्रज्वलित केले जातात. त्यानुसार येथील बालाजी मंदिर परिसर दीपमाळ दिव्यांनी सजविण्यात आला. या दीपोत्सवाची सुरुवात एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप शैने, चंदूलाल शाह, ट्रस्टचे अध्यक्ष आनंद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उत्तर भारतात त्रिपुरारी पौर्णिमा स्कंद जयंती म्हणून साजरी केली जाते, तर दक्षिण भारतात त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा होतो. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि अन्य असुरांचा देवादिकांनी वध केल्याने दीपावलीपासून दीपप्रज्वलन करण्याची परंपरा सुरू झाली असून या दीपोत्सवाची त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होत असल्याने शहरातील हजारो भाविकांनी मंदिर परिसरात एकत्रित दीप प्रज्वलित करून समाजातील दुष्ट प्रवृत्ती जाळून टाका, असा सामाजिक संदेश त्रिपुरी वाती पेटवून दिला. (प्रतिनिधी)
दिव्यांनी उजळले बालाजी मंदिर
By admin | Updated: November 15, 2016 02:31 IST