नाशिक : ओळख न पटलेलेले, बेवारसरीत्या आढळून आलेले मृतदेह काही ठराविक दिवसांपर्यंत जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवले जातात. त्यानंतर त्या मृतदेहांवर डिझेलदाहिनीद्वारे अंत्यसंस्कार केले जाते; मात्र गेल्या २२ सप्टेंबरपासून अमरधाममधील महापालिकेची डिझेलदाहिनी नादुरुस्त झाल्याने शवागारातील मृतदेहांना अंत्यसंस्काराची प्रतीक्षा आहे.जिल्हा रुग्णालयामधील शवागाराची क्षमता ही चाळीस मृतदेह ठेवण्याची असून, सध्या ३५ बेवारस मृतदेह शवागारात आहे. दोन आठवड्यांपासून महापालिकेची डिझेलदाहिनी नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेची डिझेलदाहिनी लवकरात लवकर सुरू न झाल्यास शवागार हाऊसफुल्ल होण्याची भीती जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला सतावत आहे. कारण शवागारामध्ये एकूण ३५ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असून, क्षमता केवळ चाळीस मृतदेह ठेवण्याची आहे. बेवारस अथवा अनोळखी मृतदेहांच्या अंगावरील गोंदवलेल्या खुणा, नावे, करदोडा आदि पुराव्यांच्या आधारे त्याच्या विशिष्ट जाती-धर्माचा अंदाज बांधला जातो. त्यानंतर बेवारस मृतदेहांचा अखेरचा प्रवास विधीवत सुखकर करणाऱ्या काही सामाजिक संस्थांच्या हवाली ते मृतदेह केले जातात. हिंदू-मुस्लीम धर्मीयांच्या अंत्यसंस्काराच्या रितिरिवाजानुसार त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला जातो. तसेच अपवादानेच काही मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्या बाबतीत पोलिसांकडून पुढाकार घेऊन तगादा लावला जातो.सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेपासून अमरधाममधील डिझेलदाहिनीचा मुख्य दरवाजा तुटल्याने डिझेलदाहिनी नादुरुस्त होऊन बंद पडली आहे. याबाबत डिझेलदाहिनी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाला माहिती कळविली आहे; परंतु डिझेलदाहिनी दुरुस्त करणारा कारागीर हा मुंबईवरून येणार असल्यामुळे डिझेलदाहिनीच्या दुरुस्तीला उशीर होत असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
बेवारस मृतदेहांना अंत्यसंस्काराची प्रतीक्षा
By admin | Updated: October 5, 2015 23:45 IST