नाशिक : झोपडी विकल्यास नव्या व्यक्तीकडे हस्तांतरणाची नोंद घेण्यास महापालिका टाळाटाळ करीत आहे, परंतु आता झोपडीमालकाच्या वारसांची नावे लावण्यास मनाई करण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी झोपडपट्टीवासीयांचे हाल होत आहेत.महापालिकेने तातडीने नावे नोंदवण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे शहर चिटणीस उत्तमराव उगले यांनी केली आहे. शहरात सुमारे अडीचशे झोपड्या असून साडेतीन लाख नागरिक झोपडपट्टीत राहतात. अधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार झाल्यावर पूर्व महापालिका तशी नोंद करून घेत असे मात्र नेहरू अभियानांतर्गत घरकुल योजना राबवण्याचा निर्र्णय झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून हस्तांतरण बंद करण्यात आले आहे. तसेच आता राजीव गांधी आवास योजनेच्या निमित्ताने पुन्हा हस्तांतरण बंद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आता एखाद्या झोपडीचा मालक मृत झाल्यास त्याच्या वारसांची नोंद लावण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो प्रकरणे सध्या पडून आहेत. कायदेशीरदृष्ट्या मात्र झोपडपट्टीवासीयांना हे अडचणीचे ठरत असून, महापालिकेने तातडीने किमान वारसांच्या नोंदी घ्याव्यात, अशी मागणी भाजपाचे चिटणीस उत्तमराव उगले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
वारसांची नावे लावण्यास टाळाटाळ
By admin | Updated: August 12, 2016 23:38 IST