सोमवारी सदर लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र लिलाव सुरू करण्यापूर्वी शेतकरी, व्यापारी, एजंट, कर्मचारी, हमाल, मापारी यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे सोमवारऐवजी मंगळवारपासून बाजार समितीच्या आवारात लिलाव सुरू होणार आहे.
सिन्नर बाजार समितीच्या मुख्य बाजारासह नांदूरशिंगोटे, दोडी, पांढुर्ली, नायगाव, वडांगळी व वावी येथील उपबाजार सुरू करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या वाहनांना टोकन देण्यासह त्यांची कोरोना टेस्ट करून प्रवेश देऊन बाजार समिती सुरू करण्याचे ठरले होते. तथापि, जिल्हाधिकाऱ्यांनी २१ मे रोजी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या सचिवांची बैठक घेऊन लिलाव सुरू करण्यापूर्वी शेतकरी, व्यापारी, एजंट, हमाल, मापारी, कर्मचारी व अधिकारी यांची रॅपिड टेस्ट घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि, या सर्वांची रॅपिड टेस्ट करण्यासाठी टेस्ट किट, तपासणी कर्मचारीवर्ग उपलब्ध करणे व उपाययोजना करण्यासाठी काही दिवस वेळ लागणार होता. त्यामुळे सोमवारऐवजी मंगळवारी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदूरशिंगोटे व दोडी गावात कोरोनाचे जास्त रुग्ण असल्याने सध्या या दोन उपबाजारातील लिलाव तूर्तास बंद ठेवण्यात आल्याची माहिती सचिव विजय विखे यांनी दिली.
इन्फो
टोकन वाटप सुरू
मंगळवारपासून बाजार समितीच्या मुख्य आवारासह नायगाव आणि वडांगळी येथे लिलाव सुरू होणार असले तरी लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा दाखला बंधनकारक आहे. कर्मचारी, व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनीही बाजार समितीत येताना चाचणी करून यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाहनांना प्रवेशासाठी टोकन देण्याचे काम सुरू झाले आहे.