नाशिक : इतरांच्या आयुष्यात सुगंध दरवळावा, यासाठी रस्त्यावर फुलांचे गजरे तयार करून विकणाऱ्या दहा ते बारा कुटुंबांनी उड्डाणपुलाचा आसरा घेतला आहे. मुंबई नाका ते वडाळा नाकादरम्यान थेट महामार्गाच्या दुभाजकावरच या गजराविक्रेत्यांनी संसार थाटला असून, त्यांनी पुलाचा आसरा शोधला असला तरी निवाऱ्याची जागा मात्र धोक्याची असल्याने चिमुकल्यांसोबत वास्तव्यास असणाऱ्या या कुटुंबांच्या आयुष्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.शहरामधील विविध सिग्नलवर गजरे विक णारी लहान मुले, महिला, युवक यांचा रात्री व दिवसाही मुक्काम असतो तो मुंबईनाका परिसरातील उड्डाणपुलाखाली थेट महामार्गाच्या दुभाजकावरच. यामुळे या गजरा विक्रेत्यांच्या कुटुंबांची सुरक्षा धोक्यात आली आहे. विक्रेत्यांनी घरावर होणारा खर्च किंवा शहर व परिसरात झोपड्या टाकण्याची निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे निवाऱ्याचा ‘शॉर्टकट’ हायवेवर शोधला आहे. यामुळे झोक्यात झोपणाऱ्या लहान बाळांपासून तर वृद्धांपर्यंत या विक्रेत्यांच्या कुटुंबात सदस्य आहेत; मात्र त्याचे कु ठलेही गांभीर्य विक्रेत्यांना नाही. दुभाजकावरच या विक्रेत्यांचा दिवस उगवतो आणि रात्रही सरते. महामार्गावरून भरधावपणे जाणाऱ्या वाहनांच्या आवाजात ही मंडळी बिनधास्तपणे ‘निद्रिस्त’ असते. रस्त्यालगतच्या पदपथांवर झोपणारे किंवा दुभाजकांवर झोपलेल्या भिखारींचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये यापूर्वी घडल्या आहेत. त्या घटनांची पुनरावृत्ती या ठिकाणीही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण दिवसा-रात्री वाहनचालक भरधावपणे महामार्गावरून वाहने नेतात. महामार्गाच्या दुभाजकांवर झोपणे हे धोकेदायक आहे. रात्रीच्या वेळी हा धोका कित्येकपटीने वाढतो; मात्र याची कुठलीही जाणीव या गजराविक्रेत्यांना नाही किंबहूना असूनही नसल्यासारखे हे लोक भासवत आहे. दुर्दैवाने काही अप्रिय घटना घडल्यास महापालिका, पोलीस, महामार्ग प्राधिकरण अशा सर्वच सरकारी शासकीय प्रशासनाच्या भूमिकेविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटतील यात शंका नाही.
आसरा उड्डाणपुलाचा, निवारा धोक्याचा ‘
By admin | Updated: September 6, 2016 23:14 IST