नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात पोहत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने सहायक पोलीस आयुक्त शालिग्राम पाटील (५७) यांचे रविवारी (दि़ २३) सकाळी ७़ ३० वाजता निधन झाले़ दोन महिन्यांपूर्वीच पाटील यांची रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून नाशिक पोलीस आयुक्तालयात बदली झाली होती़ धुळे जिल्ह्यातील तामसवाडी या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ पोलीस आयुक्तालयात आस्थापना विभागाची जबाबदारी पाटील यांच्याकडे होती़ रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते़ सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांनी पाण्यात सूर मारला, मात्र पुन्हा ते वरती आले नसल्याची बाब तेथे पोहणाऱ्या मुलांच्या लक्षात आली़ त्यांनी तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ राहुल पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले़ पाण्यात सूर घेत असताना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे, पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, प्रकाश सपकाळे, राजेंद्र कुटे आदिंसह पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन माहिती घेतली. (प्रतिनिधी)१९८४ बॅचचे अधिकारीशालिग्राम पाटील हे १९८४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. ३१ मे २०१७ रोजी ते पोलीस दलातून सेवानिवृत्त होणार होते़ दोन महिन्यांपूर्वीच त्यांची कर्जत येथून नाशिक पोलीस आयुक्तालयात सहायक पोलीस आयुक्तम्हणून बदली झाली होती. त्यांनी नाशिक ग्रामीणमध्ये मालेगाव, सटाणा, जळगाव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या ठिकाणी सेवा केली़ त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे़
सहायक पोलीस आयुक्त शालिग्राम पाटील यांचे निधन
By admin | Updated: October 23, 2016 23:59 IST