सिन्नर (शैलेश कर्पे) : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीला दररोज हजारो साईभक्त नतमस्तक होण्यासाठी ज्या मार्गाने जातात, त्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, भरपावसात डांबरीकरण केले जात असल्याचे पाहून या महामार्गाचे काम घाईगडबडीत पूर्ण केले जाते, की काम पूर्ण करण्याची खरोखरच तळमळ आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिन्नर - शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरवा केला जात होता. अखेर महामार्गाच्या चौपदरीकरणाला व त्याशेजारुनच पायी जाणाऱ्या भाविकांच्या पालखी मार्गाला मंजुरी मिळाली. सुमारे ६० किलोमीटर अंतर चौपदरीकरण व पायी जाणाऱ्या दिड्यांसाठी स्वतंत्र पालखी रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. हे काम युध्दपातळीवर करण्यासाठी अनेक ठिकाणी घाईगडबड केली जात असल्याचे दिसून येते.
बुधवारी दुपारी भरपावसात महामार्ग व पालखी रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पालखी रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पावसात सुरु होते. कुंदेवाडी - मुसळगाव शिवारात रतन इंडिया कंपनीसमोर रस्त्याचे काम भरपावसात सुरु असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पावसात केल्या जाणाऱ्या डांबरीकरणामुळे हा रस्ता किती काळ भक्कम राहील, यावर प्रवासी व वाहनचालकांमध्ये चर्चा सुरु झाली होती. काम वेळेत व लवकर पूर्ण करण्यासाठी घाई केली जात आहे की, खरोखरच काम करण्याची तळमळ आहे, याबाबत अनेकांनी तर्कवितर्क व्यक्त केले. काम चांगले व्हावे, असे वाटत असेल तर पावसात करणे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू केल्यानंतर वाहनांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. कामाचे फलक किंवा रात्री दुभाजक किंवा रस्ता बदलतांना रेडिअमचा वापरही फारसा दिसून येत नाही. महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपघाताला निमंत्रक ठरत असल्याच्या तक्रारी वाहनचालक करीत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर माती आल्याने वाहने सरकत आहेत. अनेक ठिकाणी गतिरोधक व खड्डे असल्याने वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरुन चालावे लागते.
-------------------
पावसाळ्यात वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामात शेकडो मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. महामार्गाचे रुंदीकरण करतांना रस्त्याच्या कडेला नवीन वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. पाऊस सुरु असल्याने डांबरीकरणाचे काम थांबवून महामार्गाच्या कडेला वृक्षलागवड करणे गरजेचे होते. मात्र, पावसाळ्यात वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करुन भर पावसात डांबरीकरणाचे काम केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
-------------------
गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
सिन्नर ते शिर्डीपर्यंत सुमारे ६० किलोमीटर अंतराचे चौपदरीकरण व पायी पदयात्रेकरुंसाठी डांबरी रस्ता बनविण्याचे काम सुरु आहे. मात्र, पावसाळ्यातच या रस्त्याचे पितळ उघडे पडायला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. खोपडी शिवारात दत्त मंदिरासमोर नव्याने बनविण्यात आलेल्या महामार्गावर अनेक गचके निर्माण झाल्याने पुन्हा हे डांबरीकरण उखडण्यात आल्याचे दिसून आले. पुलांची कामे घाईगडबडीत उरकण्यात येत असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी पावसामुळे भराव वाहून गेला आहे. त्यामुळे महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
------------------
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरण व पालखी रस्त्याचे काम भरपावसात गेले जात असल्याचे पाहून महामार्गाने जाणाऱ्या वाटसरुंनी आश्चर्य व्यक्त केले. (२३ सिन्नर रस्ता)
230921\23nsk_3_23092021_13.jpg
२३ सिन्नर रस्ता