नाशिक : जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचा पोळ्याचा आनंद द्विगुणीत झाला. निफाड, येवला, लासलगाव, विंचूर, मालेगाव, बागलाण आदि ठिकाणी पोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. काही ठिकाणी दुष्काळाचा प्रभाव या सणावर दिसून आला तर विविध शाळांमध्येही पोळा साजरा करण्यात आला.सिन्नर : येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीयन संस्कृती व परंपरांची माहिती व्हावी यासाठी थेट शाळेच्या आवारातच शेतशिवाराची उभारणी करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शेतकरी गीते सादर करत पोळ्याचा आनंद लुटला.चूल, कंदील, दळणाचे जाते, विविध भांडी, बाज, शेतीची अवजारे, विहिरीची प्रतिकृती, मोटारसायकल, टॅँकर, शेतकरी, मळणी यंत्र, शेळी, गाय, बाजार आदि साहित्याची उत्तम मांडणी करून ग्रामीण संस्कृतीचे विद्यार्थ्यांना दर्शन घडविण्यात आले. सजविलेली बैलजोडी ढोलताशा व लेजीमच्या गजरात शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ येताच माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख, अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, नामदेव गडाख, मुख्याध्यापक उदय कुदळे, सोमनाथ थेटे यांच्या हस्ते पोळ्याचे तोरण तोडण्यात आले. जयश्री सोनजे यांनी आणलेल्या पुरणपोळी व गहू-गुळाचा नैवेद्य बैलांना खाऊ घालण्यात आला. यावेळी हलक्या कोसळणाऱ्या श्रावण सरींत ४० विद्यार्थ्यांच्या पथकाने झुंजुमुंजू पहाट झाली, सर्जा-राजा हलाम जोडी आदि शेतकरी गीतांवर नृत्याचा ठेका धरला. मुख्याध्यापक उदय कुदळे, विनायक काकुळते यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पिळकोस, परिसरात अद्याप पाऊस झालेला नसून खरीपही हाती येण्याची आशा दिसत नसल्यामुळे परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती ओढवल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट दिसून आले. बहुतेक शेतकऱ्यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा केला. बैलांची सजावट करून, बैलांना गावातून मिरवून मारुतीचे दर्शन बैलांना दिले. यंदाचा दुष्काळ पेलवण्याची शक्ती दे तसेच चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली असल्यामुळे पावसासाठी साकडे घालण्यात आले. यंदाचा पोळा हा दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने फारसा उत्साह दिसत नसल्याचे सकाळपासून जाणवत होते. दरवर्षी दिसणारा उत्साह यंदा दिसून येत नव्हता.येवला : आज पोळ्याच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परवापर्यंत आतुरतेने पावसाची शेतकरी वाट बघत असतानाच ऐन सणाच्या दिवशीच पाऊस आल्याने परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (लोकमत चमू)
पावसाच्या आगमनाने पोळा उत्साहात
By admin | Updated: September 12, 2015 21:57 IST