पंचवटी : आडगाव शिवारातील श्री स्वामी समर्थनगर परिसरातील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील तिजोरीतून तब्बल १५ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच रोकड असा जवळपास ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव शिवारातील श्री स्वामी समर्थनगर येथील साहील अपार्टमेंट येथे विश्वनाथ दगडू घोरपडे यांचे घर आहे. घोरपडे हे कामानिमित्ताने नातेवाइकांकडे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील रोकड, तसेच सोन्याच्या बांगड्या,पोत, सोनसाखळी, कानातील झुबे, अंगठ्या असे जवळपास १५ तोळेहून अधिक सोन्या-चांदीचे तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास घोरपडे हे घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. घरफोडी झाल्याचे समजताच घोरपडे यांनी तत्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
आडगावला धाडसी घरफोडी;
By admin | Updated: November 20, 2015 00:01 IST